नवजात बाळाला मिळाले जीवदान

नवजात बाळाला मिळाले जीवदान- डॉ. प्रणव जाधव

एका दिवसाच्या बाळाच्या फुप्फुसाच्या डाव्या बाजूला तयार झालेल्या गाठीमुळे हृदयावर दाब निर्माण होऊन धोका निर्माण झाला होता. हा जन्मजात दोष दूर करण्यासाठी फुप्फुसातील गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. खराडीतील मदरहूड रुग्णालयातील बालरोग, तसेच स्त्री-रोग तज्ज्ञांनी केलेल्या उपचारांमुळे बाळाला जीवदान मिळाले.

मदरहूड रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. कृष्णा मेहता, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार, नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख, यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्या वेळी डॉ. प्रणव जाधव उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, ‘शालिनी मेहरा (नाव बदलले) या महिलेची २४ व्या आठवड्यात सोनोग्राफी करण्यात आली. त्या वेळी बाळाच्या डाव्या बाजूच्या फुप्फुसात एक गाठ असल्याचे आढळले. गर्भाला टाइप १ ‘कॉन्जेनिटल सिस्टिक अॅडेनोमेटॉइड मालफॉर्मेशन’ (सीसीएएम) असल्याचे निदान झाले. हा जन्मजात दोष होता. फुप्फुसात डाव्या बाजूला सौम्य स्वरूपाची गाठ होती. गाठीच्या दाबामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या दाबल्या गेल्या होत्या. परिणामी, हृदयाची जागा हलली होती. त्यामुळे हृदय बंद पडण्याची भीती होती. बाळाचे वजन गर्भात ९६४ ग्रॅम होते. डॉक्टरांनी गाठीतील द्रव काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बाळाच्या मांडीत इंजेक्शन देण्यात आले आणि द्रव काढून घेण्यात आला. सोनोग्राफीच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली.’ ‘त्यानंतर पुन्हा गाठ आली. त्यामुळे बाळाचा जन्म होईपर्यंत त्या गाठीवर लक्ष ठेवण्यात आले. बाळाच्या जन्मानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बाळाला बालशल्यचिकित्सक डॉ. प्रणव जाधव यांच्याकडे पाठविण्यात आले,’ असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

नवजात बालरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख म्हणाले, ‘अडीच किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला. त्या वेळी बाळाला श्वास घेण्याचा त्रास होत होता. बाळाच्या फुप्फुसाची वाढ होताना त्यांच्या नसांची पूर्ण वाढ न झाल्याने फुप्फुसांमध्ये पाण्याच्या गाठी तयार झाल्या. त्यामुळे बाळाला ‘कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअर वे प्रेशर थेरपी’ (सीपीएपी) देण्यात आली. त्यामुळे बाळाला श्वास घेणे शक्य झाले. बाळ जन्मल्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ. प्रणव जाधव आणि डॉ. कल्पेश पाटील यांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेला एक तासाचा कालावधी लागला. आता बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला घरी सोडण्यात आले.’

नवजात बाळाला मिळाले जीवदान नवजात बाळाला मिळाले जीवदाननवजात बाळाला मिळाले जीवदान नवजात बाळाला मिळाले जीवदान

Credit: Maharashtra Times

Total Page Visits: 3316 - Today Page Visits: 6