१८ महिन्याच्या मुलाच्या पोटात आढळला गर्भ डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात एक आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी

Dr. Pranav Jadhav - DY Patil Hospital Team

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग) – डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथे एका अठरा महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळला ही दुर्मिळ घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘फिट्स इन फिटू’ (fetus in fetu) असे म्हणतात. बाळाच्या सर्व तपासण्या करून हा अविकसित मृत गर्भ काढण्याचे आव्हान डॉक्टरासमोर होते. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचे मृत गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

The fetus was found in the womb of an 18-month-old boy.नेपाळ मधील रहिवाशी असलेल्या महिलेची अठरा महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला या बाळाच्या दिवसेंदिवस आरोग्याच्या तक्रारी होत्या व त्याचे पोट वाढत होते. त्याच्या उपचारासाठी बाळाच्या आई वडिलांनी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली. बाळाच्या आरोग्याबाबत त्वरित सर्व विभागाशी समन्वय साधून उपचार सुरु केले.

“आईचा पोटात दोन गर्भ तयार झाले होते त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली पुढे जन्मानंतर ही बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत होती त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या पुढे जाऊन इतर अवयवांवर ही गंभीर परिणाम झाला असता त्यासाठी ही गाठ शरीराबाहेर काढणे महत्वाचे होते. पाच लाख बालकांमधून एक अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार २०० अशी प्रकरणे आज पर्यत नोंदविलेली आहेत. हा मृत गर्भ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते याची कल्पना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती. ही केस डॉ सुधीर माळवदे यांनी पुढील उपचारासाठी पाठवली होती अशी माहिती डॉ माने यांनी दिली. ”

रेडिओलॉजिस्ट डॉ. विकास जाधव आणि डॉ संजय खळदकर यांनी रुग्णाची सोनोग्राफी व सी टी स्कॅन अहवालाचे मूल्यमापन केले त्यानुसार हा गर्भ बाळाच्या यकृत व उजव्याबाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आले. हा गर्भ अविकसित असून तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले.

ही गाठ वेगळी करणे हे फार मोठे आव्हान बाल शल्य चिकित्सकांसमोर होते. त्याप्रमाणे बाळाच्या सर्व आरोग्य तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले त्यानुसार मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत व मुत्राशय, आतडे ह्या अवयवांना कोणतीही इजा न होता ही संपूर्ण गाठ काढण्यात बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव व त्यांच्या टीमला यश मिळाले. पुढे डॉ जाधव म्हणाले “आमच्या टीम मधील कुशल अनुभवी शल्य चिकित्सक व इतर तज्ज्ञांच्या मदतीने तसेच उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले”.

या प्रक्रियेत लहान बाळाला भूल देणे फारच जोखमीचे होते भूल विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग भूलतज्ञ् डॉ. सोनल खटावकर यांच्या टीमने सुनियोजित भूल व्यवस्थापन करीत शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर वेदना शामक औषधे देत बाळाच्या आरोग्यस्थिती नियंत्रीत ठेऊन भूल देणे व त्याला भुलीतुन बाहेर काढणे अत्यंत अवघड व गुंतागुंतीचे होते. ही शस्त्रक्रिया ६ तासात पूर्ण झाली.

त्यानंतर डॉ. शिल्पा बाविस्कर यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले या उपचारांना बाळाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याला सामान्य वॉर्ड मध्ये उपचार देण्यात आले.

शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठीचे परीक्षणाकरीत पॅथॉलॉजी विभागच्या प्रमुख डॉ. चारूशीला गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विद्या विश्वनाथ यांच्या टीमकडे ते पाठविण्यात आले. त्याच्या सर्व तपासण्या केल्या असून गाठीपासून त्या बालकाला कोणताच धोका व दोष नसल्याचे स्पष्ट झाले. गर्भ गाठीचे वजन ५५० ग्राम असून परीक्षण मध्ये हात व पायची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोप मध्ये इतर ही अवयव दिसून आले. याला हे ‘फिट्स इन फिटू’ असल्याचे निदान झाले.

या अठरा महिन्याच्या बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले. हे बाळ आता इतर बालकाप्रमाणे सामान्य जीवन जगू शकते. त्याच्यावरील सर्व उपचार पूर्ण झाले असून त्याला आज घरी सोडण्यात आले आहे. रुग्णाच्या आई वडिलांनी सर्वांचे आभार मानले.

“या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे बालरोग विभाग प्रमुख डॉ शरद आगरखेडकर यांनी कौतुक केले” ते पुढे म्हणाले “या यशस्वितेचा आम्हाला अभिमान असून ही शस्त्रक्रिया करून आज एक मानाच्या शिरपेचा तुरा आम्ही रोवला आहे व संस्थेचे नावलौकिक वाढवले आहे.” “विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उप कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डॉ. यशराज पाटील यांनी रुग्णालयातील अद्ययावत जागतिक दर्जाची सेवा सुविधा सर्व सामान्य तसेच गरजूसाठी उपलब्ध करून दिली आहे त्याचे हे योगदान फारच मोलाचे आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व उपलब्ध सेवा सुविधांमुळे तसेच कौशल्य व अनुभवी तज्ञ् डॉक्टरांमुळे हे शक्य होऊ शकले”. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली असल्याचे ही यावेळी त्यांनी विशेष करून नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण व रुग्णालयीन व्यवस्थापनाचे पाठबळ ही फार महत्वाचे होते असे डॉ. आगरखेडकर म्हणाले.

Courtesy: Maharashtra Breaking 

Total Page Visits: 3215 - Today Page Visits: 1