दोन दिवस वयाच्या बालकाच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने तपासले असता बाळाच्या पोटात चक्क २०० ग्रॅम वजनाची रक्ताची गाठ आढळली. जठरही फुटल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढला. मात्र, बालरोग तज्ज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर बाळाच्या पोटातील गाठ काढणे आणि संसर्गावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
शिरुर येथील एका दाम्पत्याला आई-वडील होण्याचे सुख मिळाले. मात्र, दुसऱ्या दिवशी बाळाच्या नाकात लावलेल्या नलिकेतून रक्तस्राव होऊ लागला. रक्तस्राव काही केल्या थांबत नव्हता. यामुळे डॉक्टरांनी बाळाला बाणेरच्या ज्युपिटर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी बाळाला अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास तांबे यांनी बाळाची तपासणी व उपचार केले. दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर बाळाच्या तोंडातून-नाकातून होणारा रक्तस्राव थांबवण्यात त्यांना यश आले. सात दिवसांनी बाळाचे पोट फुगल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी बाळाचे जठर फुटले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच इतर भागांत गँगरीन झाल्याचे आढळले. डॉक्टरांनी तातडीने रक्ताची गाठ काढून जठराची शस्त्रक्रिया केली.
व्हेंटिलेटरवर असताना बाळाला ४८ तासांत डाव्या फुफ्फुसाला न्यूमोनिया झाला. हे दुसरे आव्हान डॉक्टरांसमोर होते. मात्र, औषधांच्या साह्याने न्यूमोनिया बरा करण्यात आला. पुन्हा काही दिवसांत बाळाच्या रक्तात बुरशींचे संक्रमण झाल्याचे आढळले, या वेळी त्याला संबंधित डोस देण्यात आले. डॉक्टरांच्या २० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आता बाळाच्या तब्येतीत सुधारणा असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला. ही शस्त्रक्रिया ज्युपिटरचे बालरोग तज्ज्ञ व ‘आयसीयू’चे प्रमुख डॉ. श्रीनिवास तांबे, बालरोग सर्जन डॉ. प्रणव जाधव व डॉ. कल्पेश पाटील यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली.
बालरोग तज्ज्ञ श्रीनिवास तांबे म्हणाले, ‘या बाळाची प्रकृती अतिशय नाजूक होती. ही केसदेखील अतिशय दुर्मीळ होती. याची माहिती कोठेही उपलब्ध नसल्याने आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अनुभवाच्या जोरावर बाळाचा जीव वाचवला.’ बाळाची प्रकृती सुधारत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
credit: Maharashtra Times