शेंगदाणा तीन महिने बालिकेच्या घशात

शेंगदाणा तीन महिने बालिकेच्या घशात

शेंगदाणा तीन महिने बालिकेच्या घशात, शेंगदाणा तीन महिने बालिकेच्या घशात, शेंगदाणा तीन महिने बालिकेच्या घशात

श्वासनलिकेत तब्बल तीन महिने शेंगदाणा अडकलेल्या एका दोन वर्षांच्या बालिकेवर कोलंबिया आशिया हॉस्पिटलमध्ये ब्राँकोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन महिन्यांपासून या मुलीचा श्वास गुदमरत असल्याने ऑक्सिजनअभावी तिची प्रकृती गंभीर झाली होती.

तीन महिने घशात घरघर व तीव्र खोकल्याची लक्षणे असलेल्या या बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडचणी येत असल्याने ती निळी पडत चालली होती. श्वासनलिकेत बाह्य वस्तू अडकल्याने श्वास घेण्यास अडचण येत असल्याचे निदान करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना खेर म्हणाल्या, पाच वर्षांपेक्षा लहान मुले अनेकदा खेळताना शेंगदाणे, खेळणी किंवा प्लॅस्टिकचे तुकडे गिळतात, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचणी येतात. अनेकदा अशा वस्तू अन्ननलिकेवाटे जातात. मात्र, या मुलीच्या श्वासनलिकेत ही वस्तू गेल्याने श्वास घेण्यास अडचण झाली. ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. परिवाराने तीन महिन्यापूर्वी अंदमानमध्ये घडलेल्या श्वास गुदमरण्याच्या घटनेला उल्लेख करताच ही बाहेरील वस्तू श्वासनलिकेत अडकल्याची घटना असल्याचे स्पष्ट झाले. छातीतील ८x४ मिलीमीटर आकाराचा शेंगदाणा काढून टाकण्यासाठी लवचिक ब्राँकोस्कोपी पद्धतीचा अवलंब केल्याने शेंगदाणा बाहेर आल्याची माहिती रेडिऑलॉजिस्ट डॉ. अरविंद तिवारी यांनी दिली. एक ते तीन वर्षांची मुले चव आणि नवीन गोष्टींचा वापर करण्यासाठी शिकत असतात. अनेकदा ही मुले द्राक्षे, मनुका, काजू आदी बिया, तसेच विविध पदार्थ व लहान खेळणी, फुगे गिळण्याचा धोका असतो. एखादी बाहेरील वस्तू अन्ननलिकेमध्ये इतके दिवस अडकणे हे दुर्मिळ आहे. इतर कोणतीही वस्तू शेंगदाण्याजवळ नव्हती, त्यामुळे त्याला काढणे तुलनेने सोपे गेले, अशी माहिती बालरोग शल्यविशारद डॉ. प्रणव जाधव यांनी दिली.

लहान मुलांना अन्नपदार्थ योग्य आकारात कापून देऊन योग्य प्रकारे चावून खायला शिकवले पाहिजे. जेवण करताना मुलांचे बोलणे, हसणे किंवा खेळणे बंद करणे आवश्यक आहे. लहान मुलांना खाण्यासाठी शेंगदाण्यासारखे कडक पदार्थ देऊ नयेत. पालकांनी सावध रहावे आणि मुलांनी तोंडात काही ठेवले आहे का, याकडे लक्ष द्यावे. शिटी, मोती, फुगे इत्यादी लहान खेळणी मुलांना देऊ नयेत. खेळण्यांचा आकार मुलांच्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Credit: Maharashtra Times

Total Page Visits: 1641 - Today Page Visits: 1